वाहन चोरी करणारी निघाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची ‘युवती’ ! आता झाली कोठडीत रवानगी | पुढारी

वाहन चोरी करणारी निघाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची ‘युवती’ ! आता झाली कोठडीत रवानगी

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर शहरात वाहनचोरी च्या घटना दिवसागणिक वाढू लागल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढला होता. नुकताच पोलिसांनी वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, या टोळीची म्होरकी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची प्रमुख कार्यकर्ता निघाली. पोलिसांनी तिच्या दोन साथीदारांसह तिघांची पोलिस कोठडी मिळविली आहे.

वैष्णवी देवतळे, असे या युवती प्रमुख कार्यकर्त्याचे नाव आहे. या युवती प्रमुख कार्यकर्त्याला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड ती आपल्या दोन साथीदारांसह चोरून नेत होती. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी हॅन्डल लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. संधी साधून वाहनावर स्वतः बसून दूरपर्यंत ढकलत नेण्यात येत होते. नंतर साथीदारांच्या साहाय्याने निर्जनस्थळी जात मेकॅनिक साथीदाराच्या साहाय्याने गाडी सुरू केली जात होती.

चोरलेले वाहन इतरत्र नेऊन त्याची विक्री केली जात होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा चोरधंदा या तिघांची टोळी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत या टोळीने चोरी केलेली एकूण ११ मोपेड वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहेत. टोळीकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वैष्णवीसह मनीष पाल, सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींची कोठडी मिळविली आहे.

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यासह तिघांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. या टोळीकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता तपास पथकाने वर्तविली आहे. ही टोळी जेरबंद असतानाही जर शहरात चोऱ्या होत असतील तर आणखी टोळ्या सक्रिय आहेत, असे मानून पुन्हा तपासाची चक्रे फिरविण्यात येतील. या टोळीचे आणखी काही साथीदार आहेत का, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे. या तिघांच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास पथकाने वर्तविली आहे.

Back to top button