गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागामार्फत आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती(एचएमआयएस) या केंद्र शासनाच्या पोर्टलवर गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांबाबतच्या निर्देशांकात गडचिरोली जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
एचएमआयआय या पोर्टलवर शहरी आणि ग्रामीण भागात देण्यात येत असलेल्या ६३ प्रकारच्या सेवांबाबत दरमहा माहिती अद्ययावत केली जाते. गरोदर मातांची नोंदणी, त्यांची रक्तचाचणी, औषधोपचार बालकांचे लसीकरण, किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण, प्रसूती, गर्भनिरोधक साधनांचा वापर, संस्थेतील प्रसूती इत्यादी सेवांचा त्यात समावेश आहे.
या निर्देशकांचे केंद्र शासनाच्या पोर्टलवर गुणांकन करण्यात येते. यावेळी गडचिरोली जिल्ह्याने त्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा आणि मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने हे यश संपादन केले आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम भाग आणि इंटरनेटची अडचण असताना आरोग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावलकुमार साळवे यांनी सांगितले.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, वेळोवेळी घेतलेले प्रशिक्षण, तसेच तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्ह्याने अव्वल स्थान मिळविल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावलकुमार साळवे यांनी सांगितले.
.हेही वाचा