भंडारा : एलोरा पेपर मिल, लोखंड शुद्धीकरण कारखाना २० वर्षांपासून बंद; हजारो कामगार बेरोजगार | पुढारी

भंडारा : एलोरा पेपर मिल, लोखंड शुद्धीकरण कारखाना २० वर्षांपासून बंद; हजारो कामगार बेरोजगार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात धानाच्या तणसीपासून व बांबूपासून तयार होणाऱ्या पांढऱ्या शुभ्र कागदाची निर्मिती करणारा देव्हाडा खुर्द येथील एलोरा पेपर मिल व माडगी येथील लोखंड शुद्धीकरण कारखाना गेल्या २० वर्षांपासून राजकीय इच्छाशक्तीअभावी बंद पडले आहेत. दोन्ही कारखाने सुरू झाले, तर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जवळपास ७ ते ८ हजार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.

४५ वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे व उद्योगपती मनोहर पटेल यांच्या संकल्पनेतून देव्हाडा खुर्द येथे एलोरा पेपर मिल व माडगी येथे लोखंडी शुध्दीकरण कारखाना (फेरो अलाईज) तयार झाला. त्यानंतर सन १९८७-८८ मध्ये देव्हाडा बुज येथे साखर कारखाना उदयास आला. १० किलोमीटरच्या परिसरात कारखान्याच्या ३ चिमण्या धूर फेकू लागल्या. जिल्ह्यात धानापासून मिळणाऱ्या तणसीला चांगला भाव मिळू लागला. तर दुसरीकडे कारखान्यात काम करण्यासाठी बेरोजगार कामाला लागला. शेजारच्या गावात लहानमोठे धंदे सुरळीत होते. दळणवळणाची साधने नसताना परिसरात समृद्धीची नांदी दिसून येत होती. पण कालांतराने सरकाराचे धोरण कारखाने बंद पाडण्यात कारणीभूत ठरू लागले. त्यानंतर कंपनी मालकांनी रोजगार कपातीचे धोरण आखून कारखानेच बंद पाडले.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दोन्ही कारखाने बंद झाले. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकीय पोळी शेकेपर्यंत आंदोलन केले. पण कारखाने सुरू झाले नाही. आता तर या क्षेत्राचे आमदार, दोन्ही खासदार यांचे राज्यात व केंद्रात सरकार आहे. दोन्ही कारखान्यातील साहित्यांना गंज लागला आहे. आमदार, खासदारांनी ठेकदारांसाठी जुन्याच रस्त्यावर रस्ते बनविण्यापेक्षा बेरोजगारांची पोटाची खळगी भरण्यासाठी दोन्ही कारखाने सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

७२ कोटींचा वीज बिल थकीत

माडगी येथील कारखान्याकडे विद्युत कंपनीचे ७२ कोटींचे वीज बील थकीत आहे. सरकार आणी कंपनी प्रशासनाने अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण राज्य सरकारने वीजबील माफ करण्यास टाळाटाळ केल्याने नाईलाजाने कंपनीने काढता पाय घेऊन अखेर कारखाना अवसयानात काढला. हीच गत पेपर मिल कारखान्याची झाली. लागोपाठ ५ ते ७ वर्षांच्या कालावधीत दोन्ही कारखाने बंद झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button