

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : भंडारा तालुक्यातील लावेश्वरजवळील सुर नदीपात्रात रेतीची चोरी होत असल्याची माहिती ड्रोनच्या पाहणीत उघड झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सुर नदीपात्रात धाड टाकून ८ ट्रॅक्टर पकडण्यात आले.
वरठी पोलीस ठाण्यांतर्गत लावेश्वर गावाजवळ सुर नदी वाहते. या नदीतून रेतीची तस्करी सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सुर नदी पात्रात ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी केली असता नदीपात्रात ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिस, महसूल आणि परिवहन विभागाचे संयुक्त पथक कारवाईसाठी लावेश्वर येथे पाठविले. पथकाला नदी पात्रात रेतीची चोरी होताना दिसून आली. पथकाला पाहून ट्रॅक्टर चालक पळून गेले. घटनास्थळी ८ ट्रॅक्टर आणि ६ ट्रॉली ताब्यात घेण्यात आल्या. संपूर्ण मुद्देमाल १९ लाख रुपयांचा आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॉली वरठी पोलिसांनी जप्त करून ठाण्यात आणले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी, सूरनदी आणि चुलबंद नदीपात्रातून दररोज रेतीची चोरी सुरू आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत ही चोरी सुरू असताना आतापर्यंत त्याला पायबंद घालण्यात यश आलेले नाही. रेती तस्कर शिरजोर झाले असून ते अधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. वेळप्रसंगी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला करण्याइतपत तस्करांची मजल गेली आहे.
हेही वाचा