भंडारा : भरधाव ट्रकने पती-पत्नीला चिरडले; घटनास्थळीच दाम्पत्याचा मृत्यू | पुढारी

भंडारा : भरधाव ट्रकने पती-पत्नीला चिरडले; घटनास्थळीच दाम्पत्याचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीस्वार पती-पत्नी रस्त्याच्या कडेला नातेवाईकांसोबत बोलत असताना विरुध्द दिशेने येणाºया कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने  दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही पती -पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा-तुमसर महामार्गावरील खरबी येथे २७  ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

बालचंद ठोंबरे (५५) आणि वनिता ठोंबरे (५० रा. वरठी, ता. मोहाडी) अशी मृतांची नावे असून नलु दामोधर बडवाईक (४०, रा. खरबी) असे जखमी महिलेचे नाव आहे.

भंडारा-तुमसर महामार्गावरुन तिरोडा अदानी कंपनीमध्ये कोळसा वाहुन नेणारा ट्रक क्रमांक एमएच ४० सीडी ४७३७ ने खरबी येथे महामार्गाच्या बाजुला उभ्या असलेल्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यात बालचंद आणि वनिता हे दोघेही ठार झाले.

अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा करीत मोहाडी पोलीस ठाणे गाठले. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. घटनास्थळावरील वातावरण चिघळत असताना घटनास्थळावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमसर, मोहाडी, भंडारा येथून पोलिसांची कुमक बोलविण्यात आली. घटनास्थळी आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली.

घटनास्थळी तुमसरचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धंदर, उपनिरीक्षक गोमलाडु, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, मोहाडी पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, उपनिरीक्षक दुधकावरा आदी तळ ठोकुन होते.

Back to top button