गोवारी हत्याकांड घडल्यानंतर पवारांनी का राजीनामा दिला नाही? : देवेंद्र फडणवीस

file photo
file photo

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडात 113 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तेव्हा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील कारवाईबाबत माझा राजीनामा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.

शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गृह खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कालही त्यांनी मुंबईत 'इंडिया'च्या बैठकीनंतर फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली होती.

फडणवीस यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंडळी महायुतीत आली आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. गोवारी हत्याकांड घडूनही शरद पवार यांना त्यावेळी राजीनामा द्यावासा वाटला नाही. त्यामुळे आता माझा राजीनामा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे काय, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, गोवारी हत्याकांडानंतर आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्याच धर्तीवर आताच्या सरकारने तसा निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे शरद पवार यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर सांगितले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news