मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी : अजित पवार | पुढारी

मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी : अजित पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणार्‍यांवर झालेला लाठीमार आणि गोळीबारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासीयांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन या भावनांशी सहमत असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागांत बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून, त्यामुळे राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी हिंसक आंदोलन थांबवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

मराठा आरक्षण तसेच लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. त्यासाठी नेत्यांनी आणि राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

Back to top button