केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मूळ मुद्दयांना बगल देण्याचा प्रयत्न | पुढारी

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मूळ मुद्दयांना बगल देण्याचा प्रयत्न

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक करणे, ही द्वेषपूर्ण कारवाई आहे. ज्यांनी देशमुखांवर गंभीर आरोप केले, ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अजूनही बेपत्ता आहेत. आरोप करणाराच जर बेपत्ता असेल, तर केंद्रामध्ये बसलेले भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मूळ मुद्दयांना बगल देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपुरात एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍नावरून देशवासीयांचे लक्ष भटकवण्यासाठी हे प्रकार केले जात आहे. अशा द्वेषपूर्ण कारवाया केल्या जात आहेत. परमबीर सिंहचा पत्ता भाजपने काढावा आणि त्याला देशासमोर आणावे, म्हणजे खरं काय ते लोकांसमोर येईल. पण केंद्रात बसलेली भाजप हे करणार नाही.

परमबीर सिंह बेल्जिअममध्ये असल्याचे कॉंग्रेस नेत्याने सांगितले आहे असे विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारजवळ येवढ्या मोठ्या यंत्रणा आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी परमबीर सिंहचा शोध घेऊन त्याला आणले पाहिजे. आम्ही तर आधीच सांगितले होते, की परमबीर सिंहचे भारतातील शेवटचे लोकेशन हे अहमदाबाद होते. ईडीनेही हीच माहिती दिली होती.

अहमदाबादमधून जर परमबीर सिंह फरार झाला असेल, तर त्यामागे कुणाचा हात आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गुजरातमधूनच त्याने पलायन केले आहे आणि केंद्रीय यंत्रणांनीच त्याला मदत केली असल्याचे पटोले म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मूळ मुद्दयांना बगल देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे असेही ते म्हणाले.

अनिल देशमुखांवर अटकेची कारवाई केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाईचा फास आवळला जात आहे. महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी भाजपचे हे कारस्थान आहे का?, असे विचारले असता भाजपच्या अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी अजिबात अस्थिर होणार नाही तर मजबूतच होणार आहे.

लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते लोक करत आहेत. पण त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. याचे कारण म्हणजे देगलुरमध्ये आज महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकतो आहे. लोकांच्याही लक्षात भाजपचे सुडाचे राजकारण आले आहे. त्यामुळे लोक त्यांचे उमेदवार आता निवडून देत नाहीत, असे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button