सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार : विजय वडेट्टीवार यांचा दावा | पुढारी

सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार : विजय वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या १५-२० दिवसात अर्थात सप्टेंबर महिन्यातच राज्यातील जनतेला राजकारणात बदल दिसेल. मुख्य खुर्ची बदलणार आणि राज्यात सत्ताबदल होणार, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये सत्तेतून पायउतार होतील, असे वडेट्टीवार यांनी भाकित केले आहे. आज राज्यात सत्तेच्या हव्यासापोटी वाट्टेल ते चालले आहे. राज्यात काहीच ऑलवेल नाही. दोन उपमुख्यमंत्री येतात तिथे मुख्यमंत्री येत नाहीत. वडेट्टीवार यांनी दावा केला की, सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. अर्थातच सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असे मी म्हणत नाही. पण मुख्य खुर्ची मात्र बदलेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेल्या स्नेहभोजनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे राज्यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विरोधकांनी अजितदादांच्या अनुपस्थितीवरून सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पावसानं दडी मारल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. राज्यात २२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात असणारे किमान ११ जिल्हे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button