‘सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलणार’ या वडेट्टीवारांच्या विधानावर बावनकुळे म्हणाले… | पुढारी

'सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलणार' या वडेट्टीवारांच्या विधानावर बावनकुळे म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार’ असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार,” असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी येत्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रात बदल होईल आणि मुख्य खुर्चीपासून सत्ता बदलण्यास सुरुवात होईल, अस वक्तव्य केले होते. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार हे स्पष्ट केले आहे. येणाऱ्या निवडणुका तीनही पक्ष एकत्र लढणार आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना काही बोलाव लागतं. मात्र विरोधकांनी कितीही स्वप्न बघितली तरी ती साकार होणार नाहीत, असा टोला त्यांनी वडेट्टीवार यांना लगावला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राजकारणातून त्यांचा काटा काढण्यासाठीच ‘कॅग’चा अहवाल आणण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला होता. याबाबत बोलाताना बावनकुळे म्हणाले की, नितीन गडकरी यांना कोणीही अडचणीत आणू शकत नाही. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँगेसमध्येच दहा तोंड दहा दिशेला असल्याची स्थिती आहे, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पाऊण तास खलबते झाली. विशेष म्हणजे या दोन्ही बैठकांवेळी अधिकारी, सुरक्षारक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. शिवाय बोलावल्याशिवाय कोणालाही आत पाठवायचे नाही, अशी तंबीही कर्मचार्‍यांना बजावण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी शिंदे गटातील दोन मंत्री तसेच पाच ते सहा आमदार तब्बल दीड तास बाहेर ताटकळत उभे होते.

हेही वाचा : 

Back to top button