भंडारा : सापळा रानडुकरांसाठी, अडकला वाघ! | पुढारी

भंडारा : सापळा रानडुकरांसाठी, अडकला वाघ!

भंडारा, पुढारी वृ्त्तसेवा : तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खंदाड येथील शेत शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या वाघाच्या मृत्यूचा उलगडा करण्यात वन विभागाला यश आले आहे. शेतकऱ्याने रानडुकरांसाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने या वाघाचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने सदर शेतकऱ्याला अटक केली असून त्याला वनकोठडी देण्यात आली आहे.

भंडारा : सापळा रानडुकरांसाठी, अडकला वाघ

खंदाड येथील रतनलाल वाघमारे या शेतकऱ्याच्या शेतात बुधवारी (दि.१६) कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला. पोलिस पाटील कमलेश भारद्वार यांच्या कानावर वाघाच्या मृत्यूबाबत चर्चा आली होती. त्यांनी सकाळी वनरक्षक वासनीक, सेलोकर यांच्यासह शेतात पाहणी केली असता रतनलाल वाघामारे याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत वाघ आढळून आला. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन वाघावर चिचोली येथील आगारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेतात विद्युत तारा टाकल्या

वन विभागाने वाघमारे घराची झडती घेतली. तेथे विजेचे तार आणि काठ्या आढळल्या. त्याला संशयाच्या आधारे ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. खंदाड येथील शेतशिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या धानाची रोवणी झाली असून रानडुकरांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाघमारे याने शेतात  विद्युत तारा टाकल्या होत्या. मात्र त्या तारांमध्ये रानडुकरांऐवजी वाघ येथून फसला. विजेच्या करंटमुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाघमारे घाबरला. त्याने वाघाच्या मृतदेहावर पालापाचोळ्याने  झाकला. दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार उजेडात आला.  या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याचे तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button