पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या नवीन ट्रॅकला ठेंगा; नव्या मेट्रो ट्रॅकअभावी पुण्याच्या तुलनेत उद्योगनगरी मागे?

पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या नवीन ट्रॅकला ठेंगा; नव्या मेट्रो ट्रॅकअभावी पुण्याच्या तुलनेत उद्योगनगरी मागे?

पिंपरी(पुणे) : देशात वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड उद्योनगरीचे नाव घेतले जाते. शहराचा वेगात विकास होत असताना शहरात कोणत्याही नवीन मेट्रो मार्गाचा समावेश झालेला नाही. त्यामुळे अनेक नव्या मेट्रो मार्गास मंजुरी मिळालेल्या पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर मेट्रोचे जाळे विणण्यात मागे राहणार असे स्पष्ट होत आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात पिंपरी-चिंचवडचा नावापुरताच समावेश आहे. शहरात पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते दापोडी असा केवळ 7.5 किलोमीटर अंतर मेट्रोचा मार्ग आहे. पुण्यात वनाज ते रामवाडी आणि बोपोडी ते स्वारगेट असा एकूण 31.2 किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग आहे.

त्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा मार्ग वगळता तीनही मार्गावर मेट्रो धावत आहे. तर, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर अंतराच्या मार्गात पिंपरी-चिंचवड शहराला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची शहरवासीयांची भावना झाली आहे. एकूण 23 स्टेशनपैकी एकही स्टेशन पिंपरी-चिंचवडमध्ये नाही. वाकड येथील केवळ 100 ते 200 मीटर अंतर भाग पिंपरी-चिंचवड हद्दीतील आहे.

तर, पिंपरी ते निगडी या 4.4 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाचा सुधारित फेरप्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडला आहे. मेट्रोचा टप्पा दोनमध्ये आता विस्तार केला जात आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात एकही नवीन मार्ग निवडण्यात आलेला नाही. पुण्यात मेट्रोसाठी तब्बल 6 नव्या मार्गाचा विस्तार होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराकडे दुर्लक्ष करण्याची मालिका कायम असल्याचे समोर येत आहे.

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या 5.4 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गास पुणे महापालिकेने मंजुरी दिली आहे. पुण्यातील स्वारगेट ते खडकवासला, हडपसर ते खराडी, एसएनडीटी ते वारजे, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, शिवाजीनगर ते हडपसर हे एकूण 62 किलोमीटर अंतराचे 6 नवे मेट्रो मार्ग होणार आहेत. या मार्गाच्या डीपीआरलाही पुणे महापालिकेने नुकतीच मंजुरी
दिली आहे.

स्वारगेट ते कात्रज मार्ग धरून एकूण 69.4 किलोमीटर अंतराचे नवे मेट्रो मार्ग पुण्यात होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात एक किलोमीटरचाही नवा मार्ग तयार होणार नाही. त्यावरून पिंपरी-चिंचवडवर दुर्लक्ष करून अन्याय झाला आहे. पुण्यात मेट्रोचे नवे मार्गाचे जाळे निर्माण होत असताना दापोडी ते निगडी या एकाच मार्गावर पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची बोळवण करण्यात आली आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड पुण्याच्या तुलनेत मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भोसरी ते चाकण, अंतर्गत रिंगरोडचा निओ मेट्रो मार्ग रखडला

इंद्रायणीनगर, भोसरी ते चाकण या 16.11 किलोमीटर अंतराचा आणि एचसीएमटीआरचा (रिंगरोड) 31.40 किलोमीटर अंतराचा शहराचा अंतर्गत मार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. या मार्गावर मेट्रोऐवजी निओ मेट्रो धावणार आहे. नाशिक फाटा ते चाकण मार्गावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बारापदरी रस्त्यांचा डीपीआर तयार केला आहे. मात्र, या दोन्ही मार्गाबाबत कार्यवाही ठप्प आहे.

पिंपरी-चिंचवडचे लोकप्रतिनिधी उदासीन ?

पिंपरी-चिंचवड शहरात मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) खा. श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) डॉ. अमोल कोल्हे हे दोन खासदार आहेत. तर, भाजपचे महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे असे चार आमदार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या नव्या मार्गाचा विस्तार व्हावा म्हणून ते केंद्र व राज्य शासन दरबारी पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. तसेच, येथील लोकप्रतिनिधी शहरात नवे मेट्रो मार्ग तयार करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निर्णय घ्यावा

पिंपरी-चिंचवड शहरात टप्पा दोनमध्ये एचसीएमटीआर मार्ग तसेच, भोसरी ते चाकण या मार्गावर निओ मेट्रोचा आराखडा करून पिंपरी-चिंचवड महापालिकेस दिला आहे. त्याबाबत महापालिकेने निर्णय घेणे अपेक्षित आहेत. प्रवासीसंख्या लक्षात घेऊन निओ मेट्रोचा हा प्रस्ताव आहे. टप्पा दोनमध्ये पुण्यात मेट्रोचे विविध मार्गावर विस्तारीकरण केले जाणार आहे. त्याला पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news