भंडारा: दीड लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्याची ३ तासांत सुटका | पुढारी

भंडारा: दीड लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्याची ३ तासांत सुटका

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलासमोर मारहाण करून वडिलांचे अपहरण करून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील एका रिकाम्या घरातील खोलीत त्यांना डांबून ठेवले होते. ही घटना लाखनी तालुक्यातील सिंदीपार-मुंडीपार येथे घडली होती. दरम्यान, ओलीस ठेवलेल्या वडिलांची लाखनी पोलिसांनी अवघ्या ३ तासात सुटका करून सराईतांच्या मुसक्या आवळल्या.
नरेश मारोती येळेकर (वय ४७, रा. सिंदीपार-मुंडीपार) असे अपहृत वडिलांचे नाव आहे. तर धीरज प्रकाश बरीयेकर (वय ३५, रा. संत रविदास, प्रभाग क्र. ३, तिरोडा, जि. गोंदिया) असे अपहरणकर्त्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर तिरोडा पोलिस ठाण्यात ३० ते ३५ गुन्ह्याची नोंद आहे.

नरेश मारोती येळेकर हे २३ जुलैरोजी ३.३० वाजता दरम्यान मुलगा ओमित सह घरी होते. यावेळी चारचाकी वाहनाने दोन अनोळखी व्यक्ती व एक महिला त्यांच्या घरी आले. नरेश येळेकर यास जबरदस्तीने धनादेश मागून आधारकार्ड घेऊन खंडणीसाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत व जीवे मारण्याची धमकी देत अपहरण केले. तसेच मुलगा ओमीत याला अश्लील शिवीगाळ केली.
ओमितच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांना घटनेची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील सोनवाणे, पोलिस हवालदार आकांत रायपूरकर, पोलिस नायक श्रीकांत वाघाये, पोलिस शिपाई विलास खोब्रागडे, क्रांतीस कराडे, स्वप्नील कहालकर यांचे पथक तयार केले. दरम्यान मुलाने वडिलांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तिरोडाचे दिशेने त्यांना नेत असल्याचे समजले. पोलिस पथक त्या दिशेने रवाना झाले. मुलास दीड लाख रुपये खंडणीकरिता आरोपींसोबत बोलणे सुरू ठेवून सापळा रचण्यात आला.

पोलिसांना आरोपींनी २ ते ३ वेळा हुलकावणी दिली. त्यानंतर तिरोडाजवळील बिर्शी फाटा येथे खंडणीची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी सापळा रचून अट्टल गुन्हेगार धीरज बरीयेकर यास अटक केली. त्याने सांगितलेल्या तिरोडा येथील एका रिकाम्या घरातील खोलीत मारझोड करून डांबून ठेवलेल्या वडिलांची अवघ्या ३ तासांत सुटका केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button