Latest
यवतमाळमध्ये १४ तालुक्यात अतिवृष्टी
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली. हवामान खात्यानेही रेड अलर्ट जारी केला होता. मात्र शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. १६ पैकी तब्बल १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यात आतापर्यंतचा सर्वात जास्त पाऊस पडल्याची चर्चा आहे. यवतमाळ २३६ तर महागाव तालुक्यात १३१ मीमी इतका पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. ग्रामीण भागामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी छतावर चढून रात्र काढली.
याशिवाय जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथकालाही पाण्यामुळे काम करता आले नाही. पहाटे पाच नंतर जोर कमी होत गेला, तेव्हा बचाव पथकाला पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढता आले. शहरातील प्रमुख महामार्गांवरूनही पाण्याची लोंढे वाहू लागले होते. त्यामुळे वाहन जागेवरच थांबली होती. बोरी तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे दहीसावळी तालुका महागाव येथील पुलावरून पंधरा फूट पाणी वाहत आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे पावसात भिजून मोठे नुकसान झाले. शेतात पूर गेल्याने पीक व शेत जमीन खरडून गेली आहे. नेमके नुकसान किती झाले याचा अंदाज बांधणे ही कठीण आहे. अनेक मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस सुरू आहे.
हेलिकॉप्टरने बचाव कार्य सुरू
महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. घटनास्थळी एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. गुरुवारी (दि. २२) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पुरात अडकून पडले आहेत. हे हेलिकॉप्टर शनिवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास आनंदनगरात दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे फिल्डवर पोहचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हजारो नागरिकांचे स्थलांतर
यवतमाळ तालुक्यातील वडगाव पोलीस स्टेशन येथील २००० नागरीक, आकपूरी(तांडा ) येथील ५०० नागरिक, यावलाचे अंदाजे ६० कुटुंब आदींचे परिसरातील आश्रमशाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.
हेही वाचा

