मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई शहर व उपनगरात पावसाचा आज (दि.२२जुलै) जोर कायम आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवेसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे या मार्गे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ही 10 ते 15 मिनिट विलंबाने सुरू होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा 6 लाख 88 हजार दशलक्ष लिटरवर पोहचला आहे. दरम्यान अरबी समुद्राला दुपारी 2.58 वाजता मोठी भरती असून यावेळी 4.14 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या काळात शहरात मोठा पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी तुंबेल, असे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.