Flooding: यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले, सुटकेसाठी दोन हेलीकॉप्टर तैनात | पुढारी

Flooding: यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले, सुटकेसाठी दोन हेलीकॉप्टर तैनात

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: यवतमाळसह १४ तालुक्यांना शुक्रवारी (दि.२२) रात्री मुसळधार पावसाने झोडपले. यवतमाळसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात २३६ मिमी तर महागाव तालुक्यात १३१ मिमी अशी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना (Flooding) करण्यात येत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यात दोन घरे वाहून गेली आहेत. येथे सुमारे ४५ नागरिक पुरात अडकले असून, त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून दोन हेलीकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. मदनभाऊ येरावार यांच्या आम्ही संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ट्विटरवरून सांगितले आहे.

यवतमाळ येथे वाघाडी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी नदी काठच्या अनेक घरात शिरले आहे. याच परिसरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू (Flooding) झाल्याचे देखील वृत्त आहे. आर्णी तालुक्यातील दातोडी, थड येथेही पैनगंगा नदीला पूर आला आहे. नदी काठच्या गावात पैनगंगेचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. आर्णी शहरात अरुणावतीचे पाणी नदीकाठच्या अनेक घरात शिरले आहे. तर वडगाव जंगल पोलीस स्टेशन येथे पुराचे पाणी गावात शिरले असून, प्रशासनाडून नागरिकांना सुरक्षितस्थळी (Flooding) हलविण्यात येत आहे.

यवतमाळ शहरातील गोदामफैल, वडगाव, लोहारा, वाघापूर आदी सखल भागातही पावसाचे पाणी शिरले आहे. झरी जामणी तालुक्यातील दिग्रस येथे पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असून, महाराष्ट्र-तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली आहे. तर अकोलाबाजार येथे नदीचा बांध फुटून पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार माजला आहे. महागाव तालुक्यातील धनोडा ते माहूर येथील पैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button