

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतात तुरी लावण्याकरता गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास बाळापुर वनपरिक्षेत्रांतर्गत सावरला शेतशिवारात उघडकीस आली. दुर्गा गुलाब चनफने (वय ४७), रा. आकापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने सावरला आकापुर परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तळोधी बाळापुर वांपरीक्षेत्रांतर्गत सावरला शिवारात दुर्गा चनफने या महिलेचे शेत आहे. आकापूर येथील रहिवासी असलेली ही महिला बुधवारी सकाळी शेतात तुरी लावण्याकरिता गेली होती. शेत शिवाराला लागूनच घनदाट जंगल असल्याने या भागात वाघांचा वावर आहे. शेतात तुरी लावत असताना दुपारच्या सुमारास तिच्यावर वाघाने हल्ला केला, वाघाने तिला जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. नेहमीप्रमाणे शेतातून काम करून घरी येणारी दुर्गा काल सायंकाळी घरी आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी शेतशिवारात शोधाशोध केली. त्या ठिकाणी पत्ता लागला नाही. त्यामुळे जंगलात शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती तळोधी (बाळापुर) वनपरिक्षेत्राधिकार्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी पाहणी करून पंचनामा केला.
हेही वाचा :