गडचिरोली : अल्पवयीन आदिवासी मुलीवर दोघांचा अत्याचार | पुढारी

गडचिरोली : अल्पवयीन आदिवासी मुलीवर दोघांचा अत्याचार

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा – दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना शनिवारी (ता.१०) रात्री घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. रोशन गोडसेलवार (वय २३, रा. आलापल्ली) व निहाल कुंभारे (वय २४, रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली) अशी आरोपींची नावे आहेत.

पीडित मुलगी एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. त्यानंतर निहाल कुंभारे याने तिला एका खोलीवर नेले. त्यानंतर संध्याकाळी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांनी त्या मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला. रविवारी (ता.११) पहाटे तिला येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावरील अतिप्रसंगाची जोरजोरात वाच्यता केली.

त्यानंतर ती आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना घटना सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. रविवारी रात्री उशिरा अहेरी पोलिसांनी आरोपी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली, अशी माहिती अहेरीचे पोलिस निरीक्षक मानभाव यांनी दिली.

Back to top button