

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक (Gadchiroli Crime) केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान २० एप्रिलच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी त्या निवडणुकीतील एक उमेदवार आणि माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण (Gadchiroli Crime) केली होती. यासंदर्भात गण्यारपवार यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी एन. डी. मेश्राम यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मेरोजी दिले होते.
या आदेशानंतर संतप्त झालेले पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी २५ मेरोजी सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करीत हुज्जत घातली. याप्रकरणी न्यायाधीशांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना अवगत केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी राजेश खांडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी राजेश खांडवे यांना निलंबित करण्यात आले.
नंतर खांडवे हे नागपूरला दवाखान्यात भरती होते. शुक्रवारी ते गडचिरोलीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांनी दिली.
हेही वाचा