Gadchiroli : मध्यप्रदेशातील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी ठार

Gadchiroli : मध्यप्रदेशातील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी ठार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कांदला गावानजीकच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. यात गडचिरोली जिल्ह्यातील नागेश तुलावी नामक नक्षल्याचाही समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास बालाघाट येथील हाक फोर्स कादला परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना चकमक उडाली. यात ३ नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये नागेश उर्फ राजू तुलावी(३५), मनोज(२८) व रामे यांचा समावेश आहे.

नागेश तुलावी हा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोटेझरी येथील रहिवासी होता. तो बालाघाट परिसरातील तांडा एरिया समितीचा डीव्हीसी होता. मनोज हा छत्तीसगडमधील पश्चिम बस्तरचा रहिवासी असून, तो नक्षल्यावाद्यांच्या मिल्ट्री प्लाटून क्रमांक १ चा सदस्य होता. रामे हीदेखील याच प्लाटूनची सदस्य होती आणि ती छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील जागरगुडा येथील रहिवासी होती.

मध्यप्रदेश पोलिसांनी नागेशवर १५ लाखांचे, तर मनोज आणि रामे यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक एके-४७, एक थ्री नॉट थ्री आणि एक १२ बोर बंदूक ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news