यवतमाळ;पुढारी वृत्तसेवा: येथील पांढरकवडा मार्गावर एका कार वॉशिंग सेंटरमध्ये कार घेऊन गेलेल्या युवकावर हल्ला करण्यात आला. तेथे त्याच्या डोक्यात व छातीत गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजता घडली. या घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. आरोपीच्या घरापुढे उभी असलेली कार व दुचाकी पेटवून दिली. यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना रात्रीच अटक केली आहे.
अक्षय सतीश कैथवास (२७, रा. इंदिरानगर) असे मृताचे नाव आहे. तो यवतमाळ येथे गृहरक्षक दलात (होमगार्ड) म्हणून कार्यरत होता. त्याची आई संगीता सतीश कैथवास यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी हसीना खान ऊर्फ लक्ष्मीबाई लिल्हारे (वय ४५), विजय लिल्हारे (४७), गोलू लिल्हारे (वय १९), खुशाल लिल्हारे (वय २१), सोपान लिल्हारे (वय २५), शरीफ खान (वय ४०), अजीज दुगे (वय ३९) या सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींच्या अटकेसाठी अक्षय कैथवास याच्या नातेवाइकाने पोलिस ठाण्यात धडक दिली. पोलिसांनी रात्रीच्या वेळीच पथक गठित करून आरोपींचा शोध सुरू केला. अक्षयचा खून केल्यानंतर अजय दुंगे व सोपान लिल्हारे हे दोघे चारचाकी वाहनाने कारंजा येथे पसार झाले होते. पोलिसांनी रात्रभर शोध घेत, या आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेले वाहन, देशी पिस्तुल व इतर शस्त्रही जप्त करावयाचे आहे. या गुन्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्याकडे देण्यात आला आहे.