गृह सचिवाच्या नावाने पाठविला बनावट बदली आदेश; महिला पोलिसाच्या पतीला अटक | पुढारी

गृह सचिवाच्या नावाने पाठविला बनावट बदली आदेश; महिला पोलिसाच्या पतीला अटक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी गृहविभागाच्या सहसचिवांच्या नावाने पोलिस अधीक्षकांना बनावट पत्र पाठविल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप वड्डेलवार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो गडचिरोली येथील वनश्री वसाहतीतील रहिवासी आहे.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना १ मेरोजी राज्याच्या गृह विभागाचा पत्ता असलेला ईमेल प्राप्त झाला होता. हा ईमेल उघडून बघितल्यानंतर त्यात एक पत्र दिसले. धोडराज पोलिस मदत केंद्रातील हवालदार जमीलखाँ पठाण यांची पोलिस अधीक्षक कार्यालयातील नक्षल सेलमध्ये, तर एटापल्ली तालुक्यातील ग्टटा (जांभिया) येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची गडचिरोली येथील पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयात बदली केल्याचा मजकूर पत्रात होता. पत्रावर गृह विभागाचे सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव आणि स्वाक्षरी होती.

मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. कारण हे पत्र गृह विभागाच्या नियमित ईमेलवरुन आलेले नव्हते. शिवाय अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभाग काढत नाही. त्यामुळे शंका आणखीनच बळावली.  नीलोत्पल यांनी सायबर सेलकडे प्रकरण सोपवले. या सेलचे पोलिस उपनिरीक्षक सागर आव्हाड यांनी चौकशी केली असता संबंधित ईमेल गृहविभागाने पाठविला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्या तक्रारीवरुन गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी तपास करुन या प्रकरणातील आरोपी संदीप वड्डेलवार यास अटक केली. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भुसारी यांनी दिली.

वड्डेलवारची पत्नी पोलिस दलात कार्यरत

संदीप वड्डेलवार हा व्यवसायाने शिक्षक आहे. त्याची पत्नी मिनाक्षी पोरेड्डीवार-वड्डेलवार ही गट्टा पोलिस मदत केंद्रात शिपाई आहे. त्याने ब्रम्हपुरी येथील एका नेट कॅफेमधून बनावट ईमेल पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात मिनाक्षी पोरेड्डीवार हिचाही सहभाग आहे का? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

   हेही वाचलंत का ? 

 

Back to top button