कर्नाटकात मोफत बस प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड अनिवार्य

कर्नाटकात मोफत बस प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड अनिवार्य

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसने सत्तेवर येताच जारी केलेल्या पाच हमी योजनांपैकी तातडीने लागू होणार्‍या महिलांना मोफत बस प्रवास योजनेची मार्गसूची सोमवारी जाहीर करण्यात आली. 11 जूनपासून ही योजना लागू होत असून, येत्या तीन महिन्यांत महिलांना शक्ती स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना सेवा सिंधू केंद्रात अर्ज करावा लागणार आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी महिलांंना शक्ती स्मार्ट कार्ड सोबत ठेवावे लागेल. हे कार्ड नसल्यास महिलांना मोफत प्रवास करता येणार नाही. या कार्डवर संबंधित महिलेचे छायाचित्र असणार आहे. स्मार्ट कार्ड तयार होईपर्यंत आधार कार्ड दाखवून प्रवास करता येईल. आधार कार्डवर कर्नाटक राज्यातील पत्ता हवा. महिला प्रवाशाने आधार कार्ड दाखवले पाहिजे आणि वाहकाने प्रवाशाला 'शून्य' भाडे असलेले तिकीट दिलेे पाहिजे, असे केएसआरटीसीचे विभागीय नियंत्रक सिद्धेश्वर हेब्बाळ यांनी सांगितले.

केएसआरटीसी मुख्यालयाला अद्याप शक्ती योजनेची माहिती मिळणे बाकी आहे. एखादी महिला आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्यातील असली तरी तिने तिचा पत्ता कर्नाटकातील असेल तर किंवा यानंतरही केला तरी तिलाही मोफत प्रवास करत येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केवळ कर्नाटकाच्या हद्दीपुरताच महिलांना बस प्रवास मोफत असेल. आंतरराज्य बसमध्ये तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. त्याशिवाय आराम बस, राजहंस बस, वातानुकूलित यंत्रणा असलेल्या बस, स्लीपर बस, ऐरावत गोल्ड क्लास, अंबारी विशेष बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार नाही.

वीजदरात वाढ

राज्य सरकारने गृहज्योती योजनेअंतर्गत 200 युनिट वीज मोफत दिलेली असतानाच, वीजपुरवठा कंपन्यांनी 1 जुलैपासून प्रतियुनिट 50 ते 51 पैसे दरवाढ केली आहे. वीज दरात वाढ करणे हा वार्षिक सुधारणांचा भाग असल्याचे ऊर्जा विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. वीज दरवाढीचा आदेश राज्यातील हेस्कॉमसह पाचही वीज विभागांना लागू आहे. हेस्कॉमने 1 जुलै ते 31 डिसेंबर या सहा महिन्यांसाठी प्रति युनिट 50 पैसे वाढ केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news