चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात १७० युवक तर, ९० रणरागिणी दाखल | पुढारी

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात १७० युवक तर, ९० रणरागिणी दाखल

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर पोलीस दलात नुकतीच नव्याने भरती करण्यात आली असून यामध्ये १७० युवक तर ९० रणरागिणी दाखल झालेल्या आहेत.  चंद्रपूर जिल्ह्यात २०२१ ची भरती प्रक्रिया जानेवारी महिन्यात पार पडली. ही प्रक्रिया १९४ पोलीस शिपाई आणि ८१ चालक पोलीस शिपायांच्यारिक्त पदांकरिता घेण्यात आली. पोलीस भरती प्रकियेकरीता २९२२१ आवेदन अर्ज ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झाले. त्यामधे २४५८९ पोलीस शिपाई (महिला-पुरुष – तृतीयपंथी) आणि ४६३२ चालक पोलीस शिपाई (महिला-पुरुष ) उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती.

मैदानी चाचणीत पात्र एकुण ९०८ चालक पोलीस शिपाई उमेदवारांची वाहन चालविण्याबाबत कौशल्य चाचणी घेण्यात आली. लेखी परिक्षा करीता ७२८ चालक पोलीस शिपाई उमेदवार तर पोलीस शिपाई पात्र ठरले होते. आणि लेखी परिक्षा अंती उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार, त्यांच्या जातीनिहाय प्रवर्गात उपलब्ध जागांनुसार व समांतर आरक्षण – निकषानुसार एकुण १९४ पोलीस शिपाई आणि ८१ चालक पोलीस शिपाई उमेदवारांसह अनुकंपातत्वावरील एकुण १६ उमेदवारांची वैद्यकीय तपासणी अंती २८ मे, २०२३ पासुन नियुक्ती देण्यात आली आहे.

आजपर्यंत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर एकुण १२५ पुरुष उमदेवार तर ६४ महिला उमेदवार तसेच चालक पोलीस शिपाई पदावर एकुण ४५ पुरुष उमेदवार तर २६ महिला उमेदवार नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार असे एकुण २६० नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार रुजू झालेले आहेत.

रुजू झालेल्या अंमलदारांपैकी पुरुष पोलीस अंमलदार यांना पुढील मुलभूत प्रशिक्षणासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापुर आणि महिला पोलीस अंमलदार यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे पाठविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु आणि पोलीस उपअधिक्षक (मुख्य) राधिका फडके यांनी सर्व नवनियुक्त महिला व पुरुष पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा;

Back to top button