Mourn of MP Balu Dhanorkar demise : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना | पुढारी

Mourn of MP Balu Dhanorkar demise : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी (दि. २०) पहाटे निधन झाले. त्यांच्या या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. (Mourn of MP Balu Dhanorkar demise)

खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक

 Mourn of MP Balu Dhanorkar demise : चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.

लढवय्या नेतृत्वाचा दुःखद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा

Mourn of MP Balu Dhanorkar demise : माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी समजताच मन सुन्न झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना पितृशोक झाल्याची माहिती कळली. पितृशोकाच्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यापूर्वीच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथे हलवण्याची माहिती मिळाली. मात्र अतिशय जिगरबाज व लढाऊ वृत्तीचे असल्याने ते नक्कीच आरोग्य तक्रारीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वस्थ होणार अशी आशा होती. मात्र नियतीने काळाचा घाला घालत धानोरकर कुटुंबीयांवर आघात केला व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचा लढवय्या शिपाही म्हणून त्यांची ओळख होती. जनतेच्या हितासाठी राबणारा लढवय्या नेता अचानक आपल्यातून गेल्याने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. चंद्रपूर – आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन म्हणजे मनाला दुःखद वेदना देणारी व काळजाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हानी झाली असून राजकारणातील एक लढवय्या नेतृत्व हरपले.अशा दुहेरी दुःखद संकट प्रसंगी संपूर्ण धानोरकर कुटुंबीयांच्या आम्ही पाठीशी असून या दुःखातून सावरण्यासाठी धानोरकर कुटुंबीयांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला

Mourn of MP Balu Dhanorkar demise : आमदार किशोर जोरगेवार 
आपल्या दबंग शैलीतुन नागरिकांचे काम करुन देणारा नेता म्हणून खासदार धानोरकर यांची ओळख होती. त्यांच्या याच शैलीमुळे प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. त्यांच्या निधनाची वार्ता मन हेलावणारी असुन त्यांच्या निधनाने राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला असल्याचे चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

शिवसेनेत असताना खासदार बाळु धानोरकर यांच्या सोबत काम केले. त्यामुळे त्यांची काम करण्याची पध्दत जवळून पाहता आली. स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय गणिताची त्यांना अचुक समज होती. त्यामुळेच ते शिवसैनीक ते खासदार असा प्रवास सहज करु शकले. 2009 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. पण ते खचले नाही. पून्हा नव्या जिद्दीने काम करत त्यांनी 2014 ची निवडणूक जिंकली. नंतर लोकसभेसाठी उभे राहत ते खासदार झाले. या प्रवासात अनेक कार्यकर्ते त्यांनी उभे केले. कार्यकर्त्यांना मोठे केले. आज त्यांच्या जाण्याने असंख्य कार्यकर्तेही पोरके झाले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

लोकहितासाठी झटणारा नेता गमावला

Mourn of MP Balu Dhanorkar demise : आमदार सुधाकर अडबाले 
खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जिवनाची सुरवात केली. संपूर्ण राजकीय जिवनात त्यांनी केवळ लोकहिताला प्राधान्य दिले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी ते नेहमीच आक्रमक राहिले. लोकहितासाठी झटणाऱ्या नेत्याच्या निधनाने संपूर्ण लोकसभा मतदार संघच नव्हे तर राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. एका शिक्षकाचा मुलगा ते खासदार हा थक्क करणारा त्यांचा प्रवास. घरी कुठलाही राजकीय वारसा नसताना कमी वयात त्यांनी राजकारणात आपले वेगळे वलय निर्माण केले होते. अशा उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धानोरकर कुटुंबियांच्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना!

हेही वाचा

Back to top button