विदर्भाचे हित बघूनच पुढची राजकीय वाटचाल ठरवणार : डॉ. आशिष देशमुख | पुढारी

विदर्भाचे हित बघूनच पुढची राजकीय वाटचाल ठरवणार : डॉ. आशिष देशमुख

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : माझ्या कुटुंबाच्या रक्तात काँग्रेस आहे. माझा जन्म होण्याच्या आधीपासून काँग्रेसशी आमचे नाते आहे, तसे संस्कार आमच्यावर झाले आहेत. विदर्भाचे हित बघून माझी पुढची राजकीय वाटचाल ठरवील जाईल, असे काँग्रेसचे बडतर्फ नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

देशमुख म्हणाले की, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय बोर्डावर होतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्याची शिस्तपालन समिती माझ्यावर बडतर्फीचा निर्णय घेऊ शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची शिस्तपालन समिती, ज्याचे अध्यक्ष तारिक अन्वर आहेत, त्यांना हा बडतर्फीचा अधिकार आहे. मी नागपूरचा असल्यामुळे मला नागपूरमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, अशी माझी अपेक्षा होती. मी माझी आमदारकी सोडून काँग्रेस पक्षात आलो होतो. त्यावेळी मला तत्कालिन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याबद्दल आश्वस्त केले होते. पण नाना पटोलेंना नागपूरमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.

मागील २० वर्षांपासून फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यावर राजकीय दृष्टीकोनातून बघण्याची गरज नसावी आणि अविश्वास दाखवू नये. मी काँग्रेस पक्षात पुढे जाऊ शकतो, याची धास्ती असल्यामुळे कदाचित माझ्यावर कारवाई केली असावी. काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन चालणे गरजेचे होते. मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढलो आहे. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बैठकीलासुद्धा बोलवत नसाल, विचारत नसाल, अपमान करूनच कोणाला पक्षाबाहेर काढायचे ठरले असेल. तर शेवटी आत्मसन्मानापोटी मी वरिष्ठांकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे काय करायचे हे मी कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवणार आहे. या बडतर्फीच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात दाद मागायची का, हे ठरवावे लागेल. एखाद्या पक्षाच्या संविधानाला कोर्टात आव्हान देता येते. कोर्टाने जर हा बडतर्फीचा निर्णय अमान्य केला. तर एक चांगली चपराक या लोकांना बसू शकते.

मी नेहमीच व्यापक दृष्टीकोन ठेऊन संपूर्ण विदर्भाचा विचार केला आहे. विदर्भाचे हित बघून माझी पुढची राजकीय वाटचाल ठरवील जाईल. विदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रभाव कमी आहे. भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष प्रामुख्याने दिसून येतात. विदर्भात काँग्रेसची परिस्थिती खराब आहे आणि याचा फायदा भाजप नक्कीच घेईल. जो पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरेल, तोच विजयी ठरेल. काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवले नाहीतर पक्षासाठी ही फार कठीण गोष्ट असेल, असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button