नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले… | पुढारी

नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले...

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : खासदार राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि संपूर्ण ओबीसी समाज नाराज होत असल्यास काँग्रेसच्या हितासाठी राहुल यांनी ओबीसी समाजाची माफी मागून हा विषय इथेच संपवायला पाहिजे होता. ओबीसी समाज दुखावल्यास त्याचा परिणाम काँग्रेसला मतदानाच्या स्वरूपात भोगावा लागेल, अशी रास्त सूचना केल्यामुळेच आपल्याला काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी बडतर्फीच्या कारवाईवर दिली.

देशमुख म्हणाले, “आपल्या निष्कासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांकडे असल्याचे द्योतक आहे. मला त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली, त्यावर मी सविस्तर उत्तरही दिले. मात्र, माझे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समाधानकारक वाटत नसल्याचे कारण त्यांनी निष्कासनासाठी दिले आहे. याचा अर्थ मला पक्षातून काढण्याचे आधीच ठरले होते आणि नोटिस नंतर दिली गेली, असाही काढता येतो. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी बलिदान दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मात्र स्वातंत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाहीत. त्यांना जो आवडत नाही, त्याला ते दूर करतात. मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांची अडचण होत होती. माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते, असा आरोप देशमूख यांनी केला.

माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद व मंत्रिपदे भूषविली. त्यामुळे माझा ओढा त्या पक्षाकडे असणे स्वाभाविक होते. पण, काँग्रेसमध्ये डोके आणि वाणी वापरणारे लोकं चालत नाहीत, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी त्या पक्षापासून दूर झालो. 2014 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढलो व जिंकलो. पण, काँग्रेसबद्दलची आस्था संपलेली नव्हती. त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांच्याशी बोलून मी पुन्हा काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेससाठी आमदारकी सोडणारा मी एकमेव आहे. ओबीसींसाठी मला काम करायचे आहे, असे मी त्यांना पक्षात परत येताना म्हणालो होतो. त्यांनी काँग्रेसमध्ये राहून तुम्हाला ते करता येईल, असे म्हटले होते. पण, महाराष्ट्रातील नेत्यांनी श्रेष्ठींच्या भावनेची किंवा काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांची देखील दखल घेतली नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसमध्ये परतल्यावर मला सातत्याने डावलले गेले. काँग्रेसमध्ये ओबीसी समाजाचे जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांची मानसिकता उच्चवर्णीयांसारखी झाली आहे. त्यांना ओबीसींचे खरे प्रश्न हाताळण्यापेक्षा ओबीसींच्या मतांशी देणेघेणे आहे. मात्र, ओबीसी लोकांनी काँग्रेसचा कावा ओळखला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बेस असलेला ओबीसी मतदार काँग्रेसपासून दूर गेला असून, काँग्रेसच्या पिछेहाटीचे ते प्रमुख कारण आहे. मात्र, यातून कोणताही बोध घेण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत. भविष्यात मला ओबीसींच्या, शेतकऱ्यांच्या व युवकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. योग्यवेळी तो सर्वांना कळेल. मी कुण्या नेत्याकडे गेलो किंवा माझ्याकडे कुणी आलो म्हणजे मी त्यांच्या पक्षात जाणार, असा अर्थ काढण्याची घाई करू नका. राजकारणाच्या पलिकडे देखील काही संबंध असतात आणि ते जपावे लागतात. एकमेकांवर टीकाटिप्पणी करून देखील मैत्री भाव जपण्याची राजकारणातल्या बऱ्याच लोकांमध्ये पद्धत आहे, असेही ते म्हणाले.

Back to top button