नागपूर : भाजयुमोने राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला | पुढारी

नागपूर : भाजयुमोने राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी. या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने महाल बडकस चौक येथे आज बुधवारी दुपारी भर उन्हात जोरदार आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. राहुल गांधी या प्रकरणी माफी मागेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. प्रसंगी दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी आम्ही धडक देऊ असा इशाराही यावेळी भाजयुमोतर्फे शिवानी दानी वखरे यांनी दिला.

महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना राहुल गांधींशी करणाऱ्या काँग्रेसने महाराष्ट्राची व देशाची माफी मागितली पाहिजे.यासंबंधीचा व्हिडिओ डिलीट केला पाहिजे या मागणीसाठी भाजयुमो कार्यकर्ते आज आक्रमक झाले होते. राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला. परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी भाजयुमो नागपूर महानगरचे प्रसाद मुजुमदार, मनपित पिल्लारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Back to top button