नागपूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जयंत पाटील यांच्यानंतर मोठे विधान करत खळबळजनक आरोप केला आहे. आपण वेगळ्या प्रकारची तडजोड केली असती, तर महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांपूर्वीच पडले असते, असा दावा देशमुख यांनी केला आहे. मात्र, आपण त्या वाटेने गेलो नाही. कारागृहात गेलो, त्रास सहन केला. ईडी करवायांविरोधात जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि सत्तारूढ पक्षामध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत.
जयंत पाटील यांनी देखील याबाबत भाजपवर आरोप केला आहे. केंद्रिय यंत्रणाचे विरोधकांविषयी महाराष्ट्रात कशाप्रकारे काम सुरु आहे. सगळ्यांना माहित आहे. अनेकांच्या बाबतीत असे प्रकार झाले आहेत. कोणी विरोधात बोलले, कोणी विरोधी भूमिका घेतली तर त्यांच्यामागे चौकशी लावली जाते. याचप्रकारे भाजपचा दबाव जयंत पाटलांवरही होता. त्यांनी स्वतःच या विषयीचा गौप्यस्फोट केला असेही ते म्हणाले.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. हे सर्व पुरावे अनिल देशमुखांनी स्वत: शरद पवारांनाही दाखवले होते. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांच्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तो नाकारताच त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांवर अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. एकंदरीत ईडीवरून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :