अमरावती : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने सुनावली २० वर्षांची शिक्षा | पुढारी

अमरावती : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने सुनावली २० वर्षांची शिक्षा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : कार्टुन पाहण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील आरोपीला अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासह दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश नंदलाल कुरील (२५, दत्तापूर, ता. धामणगाव) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. ही घटना ६ जानेवारी २०२० रोजी दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

६ जानेवारी २०२० रोजी अल्पवयीन मुलीची आई ही कामाकरीता बाहेर गेली असता, मुलगी घराबाहेर खेळत होती. दरम्यान आरोपीने तिला कार्टुन बघायच्या निमित्ताने शेजारील घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत पीडितेने घरात कुणालाही सांगितले नाही. परंतू दुसऱ्या दिवशी मुलीच्या कपडयावरील लाल डाग दिसल्यामुळे तिला आईने विचारणा केली. त्यावेळी तिने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दत्तापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून
तपास पूर्ण केला. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक द्वारका अंभोरे यांनी न्यायायालत दोषारोपपत्र सादर केले.

सदरच्या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील पी. एस. गणोरकर यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ५) पी. एन. राव यांच्या न्यायालयाने आरोपीला भादंवीची कलम ३७७ अन्वये तसेच पोक्सो कलम ४ (२) अन्वये दोषी धरले. त्यानुसार आरोपीला भादंविची कलम ३७७ नुसार १० वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड, तर पोक्सो कलम ४ (२) अन्वये २० वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा सोबत भोगण्याबाबत आदेश पारीत केला. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून ए. एस. आय. राजु उईके, व एन.पी.सी. अरुण हटवार यांनी सहकार्य केले.

हेही वाचंलत का?

Back to top button