Imran Khan Vs Asim Munir : पाकिस्तान पोळतोय माजी पंतप्रधान-लष्कर प्रमुख वादात; वादाचे केंद्र बुशरा बिवी! | पुढारी

Imran Khan Vs Asim Munir : पाकिस्तान पोळतोय माजी पंतप्रधान-लष्कर प्रमुख वादात; वादाचे केंद्र बुशरा बिवी!

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानी लष्कराचे सध्या जनरल असलेले असीम मुनीर यांना ऑक्टोबर 2018 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी आयएसआय (पाक गुप्तचर संघटना) प्रमुख म्हणून नेमले. इम्रान यांना या पदावर आपला माणूस बसवायचा होता… अखेर असीम मुनीर यांना या पदावरून 8 महिन्यांनी हटवण्यात आले. (Imran Khan Vs Asim Munir)

दरम्यानच्या काळात विविध बैठकांच्या निमित्ताने इम्रान आणि असीम मुनीर यांच्या भेटी होत असत. एका भेटीत इम्रान यांना थोडे दचकविण्यासाठी असीम मुनीर यांनी बुशरा बिवींची कुंडली त्यांच्यासमोर (इम्रान खान) ठेवली. असीम म्हणाले, की रियाझ मलीक (पाकिस्तानातील एक उद्योगपती) यांनी बुशरा बिवींना हिर्‍याचा हार भेट म्हणून दिला होता. बुशरा बिवी आणि इम्रान खान यांची कॉमन फ्रेंड असलेल्या फरहत शहजादी हिच्याबद्दलही असीम यांनी काही गोष्टी इम्रान यांच्या निदर्शनात आणून दिल्या. उदाहरणार्थ, फरहत ही अधिकार्‍यांच्या बदल्यात लक्ष घालते, बड्या आसामींशी डिलिंग करताना इम्रान यांच्याशी असलेल्या संबंधांचा गैरवापर करते… वगैरे… वगैरे… (Imran Khan Vs Asim Munir)

इम्रान खान यांना असीम यांचा हा अ‍ॅटिट्यूड अजिबात पसंत पडला नव्हता. असीम यांनी त्यांची व त्यांच्या (इम्रान) कुटुंबाची हेरगिरी सुरू केल्याची खात्री मात्र यामुळे इम्रान यांना पटली. (Imran Khan Vs Asim Munir)

एकतर बुशरा बिवी व इम्रान यांचा निकाह जमविण्यात फरहतची मोठी भूमिका होती… आणि यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकार्‍यापेक्षा फरहत या महिलेवर इम्रान यांना अधिक विश्वास होता…

विशेषत: पाकिस्तानात लष्कर, आयएसआयचे लोक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या नाड्या आपल्या हातात ठेवत असतात. त्यासाठी ते या नेत्यांची हेरगिरीही करतात. त्यांच्या वजा बाजूंची जंत्री गोळा करतात, जेणेकरून प्रसंगी त्याचा वापर करता यावा.

इम्रान यांची विद्यमान पत्नी बुशरा बिवी ऊर्फ पिंकी पीरनी यांचा राजकारणातील हस्तक्षेप वाढलेला होताच. इम्रानविरुद्धच्या तोशाखाना घोटाळा असू देत, की 50 ते 60 अब्जांचा जमीन घोटाळा असू देत बहुतांश सर्वच प्रकरणांतून बुशरा बिवींची या प्रत्येक व्यवहारात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

अल-जझीरा या वृत्तवाहिनीशी बोलताना दस्तुरखुद्द पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार मोहम्मद फैसल खान यांनी हे सगळे किस्से सांगितलेले आहेत.

इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून गच्छंती झाल्यानंतर 11 एप्रिल 2022 रोजी जेव्हा नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची नियुक्ती झाली तेव्हा ‘दुश्मन का दुश्मन दोस्त’ या न्यायाने शरीफ यांनी पहिले काम केले ते असीम मुनीर यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती!

जनरल मुनीर हे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या निवृत्तीच्या 4 दिवस आधी 25 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते, पण शाहबाज सरकारने खास असीम यांच्यासाठी कायदा बदलला आणि त्यांचा कार्यकाळ वाढवून त्यांना लष्करप्रमुख बनविले. पुढे 9 मे 2023 रोजी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे आणि माझे वैयक्तिक वैर आहे. ते स्वत:ला आता वरचढ समजत असल्याने माझा सूड उगवण्याचा शक्य तो प्रयत्न करत आहेत, असे इम्रान खान यांनी पाक जनतेला उद्देशून दिलेल्या व्हिडीओ संदेशात स्वत:च म्हटलेले आहे.

आर्मी अ‍ॅक्टनुसार कारवाई झाल्यास इम्रान खान यांना फाशीही शक्य

इम्रान यांच्या अटकेनंतर लाहोरमधील लष्कर कमांडरच्या निवासस्थानावर आणि लष्कराच्या कार्यालयांवरही पीटीआय कार्यकर्त्यांनी हल्ले चढविले होते. रावळपिंडी लष्कर मुख्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले होते. याप्रकरणात इम्रान यांच्याविरुद्ध कुठल्याही क्षणी आर्मी अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाईल, असे स्वत: पाक लष्कराने म्हटलेले आहे.

इम्रान यांच्यावर तशी कारवाई झाल्यास त्यांच्याविरुद्धचा खटला लष्कराच्या न्यायालयात चालेल… आणि लष्करी कायद्याच्या कलम-59 अंतर्गत ते दोषी आढळल्यास या कलमान्वये दिल्या जाणार्‍या शिक्षेत फाशीचीही तरतूद आहे. याआधी लष्करप्रमुख झिया उल हक यांनी तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढविले होते. पाकिस्तानात हे काही नवे नाही.

हे शत्रुत्व पाकला कोठे नेणार?

  • इम्रान यांच्याविरोधात कारवाई झाल्यास पाकिस्तानात पुन्हा हिंसाचार उफाळून येईल. अशा स्थितीत आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे.
  • आणीबाणीची परिस्थिती निर्माण करून सत्तेची सारी सूत्रे हाती घेण्याचा असीम मुनीर यांचा डाव आहे, असे इम्रान यांच्या पीटीआय या पक्षाचे म्हणणे आहे.

अधिक वाचा :

Back to top button