राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होतील, अशी शक्यता तूर्तास दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच याबाबतीत अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, असे स्पष्ट मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

दरम्यान, कर्नाटकात झालेल्या दारूण पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ही सर्वच निवडणुकीत एक नंबरची पार्टी आहे. महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेचे सरकार आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्के मतांची तयारी आम्ही करीत आहोत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला, याची कारणे वेगळी आहेत. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहेत, कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला, तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल, असेही नाही.

राज्यात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोत्तम भारत व नवभारताचा संकल्प केला आहे. २०२४ मध्ये या संकल्पपूर्तीसाठी २५ लाख युवा निवडणुकीमध्ये सहकार्य करणार आहेत, त्यासाठी युवा संवाद यात्रा काढली जाणार आहे. प्रत्येक बूथवर २५ युवा वॉरिअर्स तयार करण्याची योजना आहे. यासोबतच महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत. युवा संवाद यात्रेतून हा कार्यक्रम राबविण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button