चंद्रपूर : संतोष रावत यांच्यावरील हल्‍लेखोरांना शोधा, अन्यथा जिल्‍हाभर आंदोलन करू : विजय वड्डेटीवार

Vijay vaddetiwar
Vijay vaddetiwar

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा मूल येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील जिवघेणा हल्ला प्रकरणात पोलिस विभागाने तीन दिवसांत आरोपींचा शोध घ्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा अल्‍टिमेटम विजय वड्डेटीवार यांनी दिला. यानंतर पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आला. रविवारी सकाळी मुल शहरातील घटनास्थळ व मुख्य मार्गावर दोन श्वान पथकाद्वारे तपास करण्यात आला. 15 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तपास पथकाने बराच वेळ पहाणी व तपास केला. उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जून इंगळे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष सिंग रावत हे गुरुवारी (11 मे) च्या रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास मुल शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून घरी जात होते. या दरम्यान चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी हाताला चाटून गेल्याने रावत जखमी झाले. नशिब बलवत्त्तर म्हणून ते बचावले. घटनेनंतर रावत यांनी मुल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मूल शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मधून कारने आरोपी घटनास्थळी आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसानंतरही रावत यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे माजी मंत्री तथा आमदार विजय वड्डेटीवार यांनी शनिवारी रावत यांची भेट घेतली. रावत यांच्यावरील हल्याबाबत माहिती जाणून घेतली. पोलिस विभाग तपास कासवगतीने करीत असल्याने तपासाबाबत त्‍यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनीही तपासाबाबत मुल शहरात भेट दिल्याने विजय वड्डेटीवार यांनी त्यांची भेट घेऊन तपासाला दिशा व गती देण्याची मागणी केली. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर आरोपींना शोधून काढण्याकरीता त्यांनी तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला. तिन दिवसांत आरोपींचा शोध लागला नाही तर जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशारा देत आंदोलनाची सुरूवात मुल मधून करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.

त्यानंतर पोलिस विभाग ॲक्शनमोडवर आला. रविवारी 15 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने सकाळी नऊ वाजता मुल शहरात भेट दिली. त्यांच्यासोबत 2 श्वानपथके होती. त्यांनी सकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरात तपास केला. श्वानपथकाद्वारे या ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याच परिसरात शहरातील मुख्य मार्गावर श्वानपथकाने तपासणी केली. त्यामुळे सकाळपासून पोलिस बंदोबस्तात श्वान पथकाच्या वतीने तपास करून या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात आली आहे. आरोपींचा शोध लागला नव्हता. रावत यांच्यावरील जिवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास उपविभाग पोलिस अधिकारी मल्ल्किार्जून इंगळे यांचेकडे सोपविण्यात आला आहे.

15 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच एका एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस तपासात ऐवढा लमाजमा असतानाही तीन दिवसानंतर या प्रकरणात आरोपींचे धागेदोरे पोलिसांना गवसले नाहीत. त्यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात प्रचंड संताप व्यक्त्त केला जात आहे. विजय वड्डेटीवार यांनी तीन दिवसांचा अल्टिमेटम आहे. मंगळवारी हा अल्टिमेटम संपणार आहे. पोलिस विभागाने या प्रकरणातील धागेदोरे शोधून काढले नाहीत, तर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरणार आहे. सोबतच आंदोलनाचा इशारा आहे. त्यामुळे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्यासमोर आहे.
हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news