Maharashtra CM Eknath Shinde | बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीनपात्र गुन्हा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक | पुढारी

Maharashtra CM Eknath Shinde | बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीनपात्र गुन्हा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

पुढारी ऑनलाईन : सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात ३ हजार ५४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला विविध अपघातांत सुमारे ४० जणांचा जीव जात आहे. वाढते अपघात आणि बळी रोखण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.

अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याला फारसे यश येताना दिसत नाही. राज्यात दिवसाला ४० हजाराहून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. जानेवारी महिन्यात राज्यात २१५६ अपघात झाले असून त्यामध्ये १ हजार ५१ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात २२५० अपघातांमध्ये १२२९ जणांचा, तर मार्च महिन्यात २३३३ अपघातांमध्ये १२६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नुकताच बाइकवर जीवघेण्या स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर वांद्रे कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे (कलम २७९ ) आणि जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई केली होती.

सध्या बेफाम दुचाकी चालविणे म्हणजे फॅशन झाली आहे. अनेक युवक नशेत गाडी चालवून समोरच्या आणि स्वतःच्या जिवाशी खेळत असल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळत असून, त्यांना कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Back to top button