काकांच्या नावाने ओळखणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची चिंता करू नये : खा. श्रीकांत शिंदे | पुढारी

काकांच्या नावाने ओळखणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची चिंता करू नये : खा. श्रीकांत शिंदे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : स्वतःची ओळख काकाच्या नावाने असणाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओळखीची चिंता करू नये, जे धनदांडग्यांना जमले नाही, ती हिम्मत एकनाथ शिंदे यांनी दाखवली. आपण महाराष्ट्रबाहेर जाऊन दाखवा किती मते मिळतात ते बघा, खूप मोठी स्वप्न होती, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यासारखेच ते वागले. मात्र, पुन्हा पहाटेच्या सत्तेची पुनरावृत्ती झाली. ‘काका मला वाचवा’ अशी त्यांची अवस्था झाली. या शब्दात आज शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांचा खरपूस समाचार घेतला.

पूर्व विदर्भातील कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आज, मंगळवारी (दि.९) रात्री ते स्थानिक हॉटेल सेंटर पॉइंट येथे मार्गदर्शन करताना बोलत होते. अजितदादा भाजपसोबत जाणार, मुख्यमंत्री होणार अशा शक्यता मध्यंतरी वर्तविण्यात आल्या असताना शिंदें गट सत्तेतून बाहेर पडण्याचे बोलत होता. यानिमित्ताने तो संताप व्यक्त झाल्याचे दिसले.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, आपण शिंदे साहेबांच्या भानगडीत पडू नये त्यांची अयोध्यालाच नव्हे तर देशाला ओळख झालेली आहे. सर्व सामान्यातला माणूस मुख्यमंत्री झाला. २४ तास जनतेच्या हितासाठी काम करतात. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ सर्वसामान्यांसाठी खुले आहे. अडीच वर्षे ते सर्वसामान्यांसाठी बंदिस्त होते. अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विक्रम झाला. हे मी म्हणत नाही तर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. फेसबुक लाईव्हवर नंबर पहिला आला. खोटी आश्वासने देत त्यांनी कारभार केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा कोरोना होऊनही लोकांसाठी काम केले.

दुसरीकडे कोविडच्या नावावर अडीच वर्षे स्वतःही घरात आणि राज्यात ‘लॉकडाऊन’अशी परिस्थिती या महाराष्ट्रात बघायला मिळाली या शब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोण ओळखते? या टीकेला त्यांनी त्याच शब्दात उत्तर दिले. गद्दार, खंजीर, खोके अशी अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्या सोबत पन्नास आमदार तेरा खासदार नाही तर लाखो कार्यकर्ते आहेत. रोज नवे लोक जुळले जात आहेत. हे कधी तुम्ही समजून घेणार आहात का? मी फक्त एकटा बरोबर बाकी सर्व चुकीचे हे प्रकार किती दिवस चालणार, आम्ही गद्दार असतो तर शिंदे साहेबांसोबत लोक जोडले गेले नसते आता हे तुम्ही थांबवू शकणार नाही. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही सत्तेसाठी तिकडे गेलात, कोण कुणाची भांडी घासतो हे महाराष्ट्राने बघितले आहे. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गेले ते वेळ वाचविण्यासाठी, मात्र 8 तास तुम्ही कार चालवत गेले त्याचाही इव्हेंट केला. अजितदादा सारखा आत्मक्लेष करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. लोकांना अभिप्रेत असेच काम शिंदे- फडणवीस सरकार करीत आहे. यापुढच्या काळात विदर्भात संघटन वाढणार, अभी पिक्चर बाकी है… असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. दुसरीकडे ‘वज्रमठ’ च्या निमित्ताने कधी आमच्यावर टीका करणारे आता स्वतःच आपसात टीका करत आहेत सत्तेसाठी एकत्र आलेली ही आघाडी अधिक काळ चालणार नाही असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भोंडेकर, किरण पांडव, मंगेश काशीकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा :

Back to top button