मी पुन्हा आलो असतो तर मुख्यमंत्री म्हणूनच आलो असतो : नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला | पुढारी

मी पुन्हा आलो असतो तर मुख्यमंत्री म्हणूनच आलो असतो : नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : मी पुन्हा आलो असतो, तर मुख्यमंत्री म्हणूनच आलो असतो. उपमुख्यमंत्री म्हणून आलो नसतो, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना येथे पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही. बिघाडी आहे ती राज्यातील असंविधान सरकारमध्येच आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

नाना पटोले म्हणाले की, असंविधानाने सत्तेवर आलेल्या राज्यातील सरकारबद्दल व भाजप पक्षाबद्दल जनतेत प्रचंड असंतोष आहे. याचा प्रत्यय लवकरच येईल. शेतकरी, कामगार, बेरोजगारांच्या प्रश्नाकडे या सरकारचे दुर्लक्ष केले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल. येथे निवडणुकीत पक्षाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. कमिशनखोर सरकारबद्दल तेथील जनतेत प्रचंड असंतोष आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या नाराजीबद्दल बोलताना ते म्हणाले, यासंदर्भात बैठकीत चर्चा करुन मार्ग काढला जाईल. भाजपसोबत जो कोणी संबंध ठेवेल, त्याला काँग्रेस पक्षात स्थान नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशा संदर्भातील प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले, या संदर्भात अद्याप काँग्रेस पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास बघू.

काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावर नाराजी व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले, या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी अनेकवेळा चर्चा करुनही त्यांनी ऐकले नाही. शिवसेनेतीलही अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. आता काय करायचे ते पाहू. राज्यातील सत्तांतरावरील न्यायालयाच्या निकालावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

हेही वाचा 

Back to top button