Unseasonal rain in Vidarbha : विदर्भात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; काय आहे वैज्ञानिक कारण ? जाणून घ्या | पुढारी

Unseasonal rain in Vidarbha : विदर्भात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; काय आहे वैज्ञानिक कारण ? जाणून घ्या

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : सध्या नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याचा (Unseasonal rain in Vidarbha)  धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शेतपिके, भाजीपाला, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 5 मेपर्यंत हीच स्थिती राहणार असून 6 मे पासून आकाश निरभ्र होईल, तापमान वाढेल, उन्हाळ्याचा अनुभव वैदर्भीयांना घेता येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनेकांनी एप्रिलच्या कडक उन्हाचा अंदाज घेत लग्न, स्वागत समारंभ ठरविले. मात्र, सर्वांचीच या अवकाळी पावसाने तारांबळ उडविली आहे.

मात्र, या अवकाळी पावसाचे (Unseasonal rain in Vidarbha)  वैज्ञानिकदृष्ट्या कारण काय ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘ दैनिक पुढारी’ने केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिदेशक मोहन लाल साहू यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. साहू म्हणाले की, खरेतर विदर्भ हा सर्वाधिक तापमानासाठी ओळखला जातो. नागपूर, अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची सरासरी नोंद होते. यामागचे कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तर- पश्चिम असे राजस्थानकडून वारे वाहतात. त्यामुळे विदर्भाचे वातावरण तापते.

यावेळी पश्चिम भारतात अँटी सायक्लोन तयार झाले आहे. दक्षिण पूर्व वारे बंगालच्या उपसागरातून तर पश्चिमी वारे अरब सागरातून वाहत असल्यामुळे द्रोणिका तयार झाली आहे. त्यामुळे सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. वेगवान वाऱ्याच्या अनियमिततामुळे ही परिस्थिती विदर्भात निर्माण झाली आहे. यापूर्वी 25 ते 28 एप्रिलपर्यंत येलो, ऑरेंज अलर्ट विदर्भासाठी देण्यात आला होता. पुढे तो 30 पर्यंत आणि आता 5 मे पर्यंत वाढविला आहे. त्यामुळेच विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. वाऱ्याची अनियमितता यामुळे विदर्भात 5 मेपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार असल्याची माहिती नागपुर हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रविणकुमार यांनी ‘पुढारी’ शी बोलताना दिली. यानंतर नागपूर आणि विदर्भात कडक उन्हाळा जाणवेल, असेही त्यांनी सांगितले.

 

हेही वाचा 

Back to top button