

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेला नागपुरातील संविधान चौक हा सातत्याने परिवर्तनशील चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेला आहे. मंगळवारी (दि. सायंकाळी मात्र या चौकाने एक अनोखा ऋणानुबंधाचा सोहळा अनुभवला. घोषणा निनादनाऱ्या या चौकात एका नवदांपत्याची नात्याची वीण अधिक घट्ट झाली.
येत्या 25 मे रोजी हा विवाह सोहळा होणार असल्याने आज साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. वेणा सातगाव येथील तीनशेवर कुटुंबीय गेल्या आठवड्याभरापासून संविधान चौकात ऊन, वारा,पाऊस झेलत आंदोलन करीत आहेत. 15 ते 20 वर्षापासून वास्तव्य असताना ग्रामपंचायतीने नोटीस बजावत या सर्वांच्या घरांवर, झोपड्यांवर पर्यायाने त्यांच्या स्वप्नांवर बुलडोजर फिरवला. तेव्हापासून पायी चालत नागपुरात आलेले हे नागरिक संविधान चौकातच मुक्कामी आहेत. याच वस्तीतल्या पूजा नामक मुलीचे लग्न तोंडावर असताना हे संकट ओढवले. गेले काही दिवस नागपुरात सतत वादळी वादळी पाऊस सुरू असतानाही हे लोक संविधान चौकात ताडपत्री डोक्यावर घेऊन ठिय्या ठेवून आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी भेट घालून द्यावी, आमची जागा आम्हाला परत मिळावी, निवाऱ्याचा प्रश्न सोडवावा आदी मागण्यासाठी हे नागरिक या ठिकाणी ठाण मांडून आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशभरातील सर्वांना आपल्या हक्काचे घरकुल मिळेल असा नारा दिला दुसरीकडे आमच्या घरावर बुलडोझर फिरवला गेला हा विपर्यास का,असा सवाल या नागरिकांचा आहे.