नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील कोळसा खदान परिसरात माजी आमदार वामनराव चटप, मुकेश मासुरकर आदींच्या नेतृत्वाखाली विदर्भवादी कार्यकर्त्यांनी कोळसा रोको आंदोलन केले. या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पोलिसंनी उमरेडमधून ताब्यात घेतले.
महाराष्ट्र दिनी झालेल्या या आंदोलनात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकर्ते काळ्या टोप्या, ड्रेस, हाताला पट्ट्या बांधून आले होते. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. नागपुरातील सदर परिसरात देखील विदर्भवादी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांचे बॅरिकेड तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नातील स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान यावेळी ३१ डिसेंबर पर्यंत विदर्भ राज्य मिळवू असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्वात मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन होत असताना विदर्भातच वीज महाग आहे. बेरोजगारांची फौज आहे. रोजगार नसल्याने आता आमचे राज्य विदर्भ राज्य वेगळे झाल्याशिवाय पर्याय नाही आमचा कोळसा आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा निर्धार यावेळी मुकेश मासुरकर यांनी बोलून दाखवला. आमचे राज्य, विदर्भ राज्य, विदर्भ आमच्या हक्काचा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नागविदर्भ आंदोलन समितीतर्फे काळा दिवस, ना गडकरींना निवेदन दरम्यान,नागविदर्भ आंदोलन समितीतर्फे 1 मे हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळला गेला. विदर्भवादी आंदोलकानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निवेदन देण्याची मागणी पोलिसांना केली होती. पोलिसांनी नितीन गडकरी यांना हे कळविले. गडकरी यांनी अहमद कादर यांच्यासह पाच आंदोलकांना आपल्या घरी बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.