२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकू : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकू : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही १६४ आहोत पण २०२४ मध्ये २०० प्लस राहू. जनतेला अपेक्षित असं सरकार येईल. वेळकाढूपणा नव्हे तर रस्त्यावर सही करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने भेटला आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमच पाहिला आहे. अडीच वर्षे तर उद्धव ठाकरे यांच्या खिशात पेनही नव्हता. पण आताचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे जिथे भेटतील तेथील जनतेचे समाधान होत आहे. बाजार समितीमध्येही सध्या पक्षीय राजकारण नाही, असंही ते म्हणाले.

सहकार खात्यात याची आघाडी त्याची आघाडी असते. कब्जा वैगेरे काही नसते. स्थानिक पातळीवर राजकारण नको. सत्ता गेली पन्नास – पन्नास लोक निघून गेले, संघटना हातून जात आहे मात्र अजूनही सत्तेचा बाणा जात नाही. उद्धव ठाकरे यांना एका भुमिकेवर थांबता येत नाही. ते सत्तेत होते तेव्हा वेगळं मत होतं, आता विरोधक आहेत तेव्हा मतं बदलली, असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

दरम्यान, लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षाचा अधिकार आहे. मग यात रोहित पवार होणार की आणखी कोणी हा निर्णय महाविकास आघाडीचा असेल गेल्यावेळी सुधीर मुनगंटीवार होते असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.  2029 पर्यंत मविआला सत्तेची संधी नाहीच, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button