सोमेश्वरनगर : हार्वेस्टरचे कर्ज कारखान्याने का भरावे ? अजित पवार | पुढारी

सोमेश्वरनगर : हार्वेस्टरचे कर्ज कारखान्याने का भरावे ? अजित पवार

सोमेश्वरनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हार्वेस्टर घेण्यासाठी कारखान्यांनी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले, तर उसाचा दर कमी घेण्याची सभासदांची तयारी आहे का, असा सवाल करून हार्वेस्टर खरेदीसाठी घेतलेले कर्जाचे व्याज कारखान्याने का भरावे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. वाणेवाडी (ता. बारामती) येथील सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले यांच्या मातोश्री सुमन भोसले यांचे नुकतेच निधन झाले. भोसले कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीवेळी पवार बोलत होते.

या वेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, सुनील भोसले, विक्रम भोसले, दिग्विजय जगताप आदी उपस्थित होते. पवार यांनी या वेळी भोसले कुटुंबीयांची विचारपूस करत सध्या ऊस किती आहे, ठिबक आहे का, दूध व्यवसाय आहे का, अशा प्रकारची चौकशी केली.

या वेळी पवार म्हणाले, दूध व्यवसायाला चांगले दिवस आहेत. केंद्राने दूध आयात करू नये यासाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. कोणताही व्यवसाय करताना त्याचे अनुदान मिळणार आहे हे गृहीत धरून तो व्यवसाय करू नका. हार्वेस्टरबाबत ते म्हणाले, ज्या दिवशी अनुदानाचा आदेश निघाला आहे त्याच दिवसापासून पुढच्यांना अनुदानात सवलत मिळणार असल्याचे पवार यांना सांगितले.

Back to top button