चंद्रपूर- नागपूर महामार्गावर बस – ट्रकची धडक ; ५ जण जखमी | पुढारी

चंद्रपूर- नागपूर महामार्गावर बस - ट्रकची धडक ; ५ जण जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर वरोरा नंदोरीजवळ आराम बस आणि ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात आज (दि.२३) दुपारी झाला. यात चालकासह पाच जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. प्रतीक रवींद्र आलम, अश्विनी शंकर मेश्राम, बसचालक शुभम रमेश पोलपोलवार, अतुल ठाकरे अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर येथून डीएनआर खासगी बस (एमएच 34 बी एच 7577) आज दुपारच्या सुमारास नागपूरला निघाली होती. यावेळी चंद्रपूरच्या दिशेने ट्रक (एमएच 34 ए बी 3840) येत होता. यावेळी नंदोरी टोल नाक्याजवळ बसची आणि ट्रकची जोराची धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

या अपघातानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button