नागपूर: १.२१ कोटींचा अवैध औषधसाठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई | पुढारी

नागपूर: १.२१ कोटींचा अवैध औषधसाठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नियमबाह्यपणे औषधविक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला. यावेळी 1 कोटी, 21 लाख, 56 हजार, 981 रुपयांच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला. 295 मेडिकल स्टोअर्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर 264 स्टोअर्सचे परवाने निलंबित केले. तर 31 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यासोबतच चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या अनेक मेडिकल स्टोअर्सविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात एमटीपी कीटची अवैधरित्या विनाबिल अधिक पैसे घेऊन विक्री करणे, विनापरवाना औषधांचा साठा, बोगस डॉक्टरच्या रुपात प्रॅक्टिस करून एलोपॅथी औषधांचा साठा करणे, विनाप्रिस्क्रिप्शन, विनाबिल व वैध फॉर्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करणे. तसेच अंमली औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध विभागाने कारवाई केली.

यात मे. प्रकाश मेडिकल अँड जनरल स्टोअर्समध्ये एमटीपी किटची अवैधरित्या विक्री करताना आढळून आली.. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. डॉक्टरची डिग्री नसतानाही प्रॅक्टिस करणारे उमाकांत मानकर यांच्याकडे छापा टाकून 1,08,418 रुपयांचा अॅलोपॅथिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला. धन्वंतरी औषधालय, सचिन मेडिकल स्टोअर्स, गजानननगर, अजय मेडिकल स्टोअर्स, मे. हार्दिक एंटरप्राइजेस, सुरगुरु मेडिकल स्टोअर्स, मे. भागवत कृपा मेडिकल स्टोअर्स, दहेगाव, शाम मेडिकल स्टोअर्स, मे. संजोग फॉर्मा सर्जिकल, स्वामी कृपा ट्रेडर्स, मे. संदेश फॉर्मा, मे. संजीव मेडिकल स्टोअर्स, मे. कांचन मेडिकल स्टोअर्स आदींवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सदोष औषधेही आढळली. विभागाने काही मेडिकल स्टोअर्समधून निकृष्ट औषधांचा साठासुद्धा जप्त केला. यात एकूण 1.21 कोटी रुपयांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला. लूपिनला मिळून एकूण 29 स्टोअर्सवर छापेमारी करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button