नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल रखडले | पुढारी

नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल रखडले

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांची तयारी सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून परीक्षा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस असताना अद्याप हिवाळी सत्रांचे निकालच लागले नाही. नियमानुसार परीक्षेनंतर 45 दिवसांमध्ये निकाल लावण्याचा नियम आहे. मात्र, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. एम.कॉम., एम.ए. सह अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 120 दिवसांचा कालावधी लोटूनसुद्धा निकाल लागले नाहीत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तर दुसरीकडे 500 हून अधिक संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निकालांना उशीर होण्यामागे एमकेसीएल हे प्रमुख कारण आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याची जबाबदारी विद्यापीठाने एमकेसीएलला दिली होती. मात्र, एमकेसीएलसोबतचा करार रद्द केल्यानंतर या एजन्सीने विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाला देणे टाळले आहे. अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची आकडेवारीदेखील अद्याप विद्यापीठाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाला विलंब होत आहे. हिवाळी निकाल उशिरा लागल्यास मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाळी सत्राची परीक्षा घेणे कठीण होऊन बसणार आहे. परीक्षेला उशीर झाल्यास पुढील सत्रात पुन्हा विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल. निकालाच्या विलंबाबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. दररोज विद्यार्थी संघटना विद्यापीठावर खापर फोडत आहेत. कुलगुरूंसह अधिकारी नुसती आश्वासने देत आहेत. मात्र, आजतागायत समस्येवर तोडगा काढण्यात यश आलेले नाही.

व्यवस्थापन परिषद सदस्य समय बनसोड आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यापीठ शिक्षण मंचच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी परीक्षेला होणाऱ्या दिरंगाईसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नवीन सत्रासाठी विद्यापीठाने शैक्षणिक दिनदर्शिका जारी करावी. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्याप दिलेले नाहीत. परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर 8 दिवसांच्या आत रोल नंबर मिळाला पाहिजे आणि त्यानंतर परीक्षा घेण्यात यावी, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. या चर्चेप्रसंगी विष्णू चांगडे, मनीष वंजारी, अजय चव्हाण, प्रथमेश फुलेकर, दिनेश शेराम, रोशनी खेलकर, वामन तुर्के उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button