chandrakant patil यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका - पुढारी

chandrakant patil यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

शरद पवार सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य काहीही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मग तो कोळसा कमी असोत, की इतर काहीही असो, नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती आहे. अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ( chandrakant patil )  महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. नागपुरात मेळाव्याकरीता ते आले असता विमानतळावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

चंद्रकांत पाटील ( chandrakant patil ) पुढे म्हणाले, जर पवार यांना केंद्राची ॲाफर होती, तर ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत. केंद्रात सत्ता असलेल्या पक्षासोबत जाणे याची त्यांनी निवड केली असती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना पवार काय बोलतात हे कळते. महाविकास आघाडीतील नाराजी आपल्या पदरात काही टाकून घेण्यासाठी असते. त्यावरून काही निष्कर्ष काढण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

महिला सुरक्षेवर बोलताना ते म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करायची आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरच्या गुन्ह्यांवर सर्व जण बोलायचे, आता नितीन राऊत झोपा काढतात का? त्यांना नागपूरातील गुन्हेगारी कळत नाही का? महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहे. महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र सुरक्षित होता. पण आता महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्र रसातळाला गेलाय, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, माझ्या काळात सुप्रिया सुळे खड्ड्यांसोबत सेल्फी काढायच्या, आता त्यांना महिला-मुलींसंदर्भातील गुन्हे, कोयत्याने वार करणे दिसत नाही का? विद्या चव्हाण, निलमताई सत्तेसाठी ॲडजेस्टमेंट करत आहेत. यावर बोलत नाहीत, असाही त्यांनी टोला लगावला.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांच्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे चुकीचा अर्थ लावला. जनता मी मुख्यमंत्री असल्यासारखी अपेक्षा करते, जे त्यांना मराठवाड्याच्या प्रवासात जाणवलं, असं देवेंद्रजी म्हणाले. लोकांना उद्धवजींकडून अपेक्षा नाही, ते बाहेर पडणार नाहीत हे जनतेनं गृहित धरलंय. प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस फिल्डवर आहेत. त्यामुळे लोकांना ते मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आमची संघटना लोकशाही पद्धतीनं चालते, त्यामुळे काल आमची रुटीन बैठक होती. पवारांची बैठक कशासाठी होती हे मला माहित नाही. राष्ट्रवादीच्या जनसंपर्क यात्रेवर बोलताना ते म्हणाले की, अशी वेळ आली की सत्ताधारी राष्ट्रवादीला जनसंपर्कासाठी यात्रा काढावी लागेल. ‘ओ शेतकरी बंधुंनो आम्ही तुम्हाला काहीच दिलं नाही, विमा दिला नाही’ हे सांगण्यासाठी राष्ट्रवादी जनसंपर्क यात्रा काढणार का? असा सवाल त्यांनी केला.

Back to top button