अफगाणिस्तानात १० लाख बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होण्याचा धोका! - पुढारी

अफगाणिस्तानात १० लाख बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होण्याचा धोका!

काबूल ; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानात कुपोषणाच्या समस्येवर तातडीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर 2021 अखेर अंदाजे 10 लाख बालकांना गंभीर स्थितीला सामोरे जावे लागून यात त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असल्याचे युनिसेफच्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे.

युनिसेफचे उपकार्यकारी संचालक उमर आब्दी यांनी नुकताच अफगाणिस्तानचा दौरा केला. काबूलमधील रुग्णालयात त्यांनी अशा बालकांची भेटही घेतली. अफगाणिस्तानातील या गंभीर समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर किमान दहा लाख बालके कुपोषणाने बळी पडतील. या व्यतिरिक्त गोवर आणि अतिसारासारख्या आजारांनी अनेक बालके मृत्युमुखी पडण्याचा धोका असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

तालिबान सरकारमधील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मुलांचे आरोग्य, लसीकरण, स्वच्छ पाणी तसेच इतर बालसंरक्षण सेवांचे महत्त्व विषद केले. पोलिओ, गोवर, कोरोना लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्याचे आव्हान त्यांनी तालिबान सरकारला केेले.

शिक्षणासाठी भर देणार

अफगाणिस्तानात प्रत्येक मुलगा-मुलीने शाळेत जावे, अशी युनिसेफची भूमिका असून त्यासाठी युनिसेफ प्रयत्नशील राहील. गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आरोग्य आणि हिंसामुक्त जीवन यासाठीही प्रयत्न केले जातील, असे आब्दी यांनी स्पष्ट केले.

Back to top button