

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्याच्या सीमावर्ती भागातील हिक्केर गावानजीकच्या जंगलात शनिवारी (दि.१) सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका नक्षल्यास कंठस्नान घातले आहे. समीर उर्फ साधू लिंगा मोहंदा असे ठार झालेल्या ३१ वर्षीय नक्षल्याचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.
आज सकाळपासून पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान हिक्केर परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह सापडला. शिवाय नक्षल्यांच्या ३ बंदुका आणि दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे. यातील मृत नक्षलवादी समीर मोहंदा हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चा सदस्य होता, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.