ठाकरे गटाला मोठा धक्का; नागपूर शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपात प्रवेश | पुढारी

ठाकरे गटाला मोठा धक्का; नागपूर शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपात प्रवेश

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे शिंदे गटाने अनेकांना आपल्या गोटात ओढल्यानंतर आता भाजपने देखील ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी गुरुवारी (दि.३०) नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे भाजपात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे पक्षात स्वागत करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दिलीप माथनकर यांनी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार मागे घेतल्यानंतर काँग्रेससाठी ही जागा सोडल्यानेही त्यांनी उघड टीका करीत शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. अखेर जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यात शिवसेना व भाजपाची युती मागील अनेक वर्षापासून आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. शिवसेना हा भाजपाचा वैचारिक मित्र असताना शिवसैनिकांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी वैचारिक शत्रू असलेल्या पक्षांसोबत आघाडी केली, यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता असून भाजपामध्ये प्रवेश करून हिंदुत्वाच्या विचारांवर काम करता येईल, या विचाराने प्रवेश घेतला असे यावेळी दिलीप माथनकर यांनी सांगितले.

यावेळी आमदार मोहन मते माजी महापौर संदीप जोशी, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष गजेंद्र आसोटकर, डॉ. अभय दातारकर, प्रफुल वाहादुडे, प्रशांत घोरमारे, सीए कैलास अडकिने, राजेंद्र नाकाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढारी वृत्तसेवा :

Back to top button