चंद्रपूर : अंगणात बसलेल्या पाच वर्षांच्या बालकाला आईच्या समोर वाघाने नेले उचलून | पुढारी

चंद्रपूर : अंगणात बसलेल्या पाच वर्षांच्या बालकाला आईच्या समोर वाघाने नेले उचलून

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अंगणात बसलेल्या पाच वर्षांच्या बालकावर वाघाने अचानक हल्ला केला. त्यानंतर तोंडात घेऊन उचलून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२९ मार्च ) सायंकाळी सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा या गावी घडली. हर्षद संजय कारमेंगे (वय ५, रा. बोरमाळा) असे बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. वनविभागाने ताबडतोब त्या बालकासाठी शोधमोहीम सुरु केली परंतु शोध लागला नाही. गुरूवारी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली असता घटना स्थळापासून काही अंतरावर मृतदेहाचे तुकडे तुकडे आढळून आले.

सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गेवरा बिटातील बोरमाळा येथील अतिक्षा कारमेंगे ही महिला रहिवासी आहे. तिला पाच वर्षाचा हर्षद नावाचा मुलगा होता. बुधवारी त्या मुलाला त्याच्या आईने घरच्या अंगणातच बसविले होते. त्या परिसरात अंधार होता. याच अंधारात वाघ दडून बसला असताना त्याने आईच्या समोरच हर्षदवर हल्ला चढविला. यामुळे आई घाबरली. मुलाला वाचविण्यासाठी प्रचंड आरडाओरड करू लागली. आईच्या डोळ्यांदेखत मुलाला वाघाने उचलून नेले.

मुलाला वाचविण्यासाठी आईचा आरडाओरड ऐकून शेजारचे नागरिक धावून आले. तोपर्यंत वाघाने बालकाला तोंडात घेऊन पळ काढला होता. बालकाला वाचविण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळापासून झुडपात शोधाशोध केली. परंतु मुलाचा शोध लागला नाही. तातडीने वनविभाग व पाथरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. काहीवेळातच घटनास्थळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरूरकर, पाथरीचे क्षेत्र सहायक एन. बी. पाटील, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड व त्यांनी तपास सुरु केला.

गुरुवारी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर बालकाच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे आढळून आले वन विभाग व पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे जमा करून पंचनामा केला. त्यानंतर त्यानंतरच सर्व विच्छेदन करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. गावात येऊन वाघाने बालकाला उचलुन नेल्याने स्थानीक नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी दुर्गापूरमध्ये वाघाने एका बालकाला घरातून अशाच प्रकारे बालकाला उचलुन नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याच्या आईने वाघाला पिटाळून लावल्याने बालकाच्या जीव वाचला.

अधिक वाचा :

Back to top button