नागपूर: पुढारी वृत्तसेवा: बेळगावच्या तुरुंगातून कसेही करून बाहेर पडण्यासाठी कुख्यात गँगस्टर जयेश पुजारा उर्फ जयेश कांथा याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा धमकीचे फोन केल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या चौकशीत उघड झाली आहे.
बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलीस येथून बाहेर काढतील. आणि संधी मिळताच पोलिसांच्या कोठडीतून पसार व्हायचे, अशी त्याची योजना होती.
जयेश हा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला कैदी आहे. हत्येच्या दोन प्रकरणांमुळे फाशीची शिक्षा कमी होऊन त्याला जन्मठेप मिळाली आहे. मात्र, सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. जन्मठेप झाल्याने जयेशला आयुष्यभर तुरुंगातच राहावे लागणार आहे. यामुळेच तो तुरुंगातून पळून जाण्याच्या योजनेवर काम करीत होता. यातूनच त्याने बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी आणि पळून जाण्याची संधी शोधत होता. नुकतेच जयेश कांथा यास ताब्यात घेत नागपूर पोलीस घेऊन आले.
याप्रकरणी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतच आरोपी जयेशने काही खुलासे केले आहेत. दरम्यान, या कुख्यात आरोपीला बेळगाव कारागृहात फोन कसे काय उपलब्ध झाले, याचीही चौकशी आता कर्नाटक पोलिसांसोबत नागपूर पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा